देवघर पूजास्थान, ईशान्य दिशा आणि वास्तू सल्ला
घरातील वातावरण प्रसन्न राहवे, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून प्रत्येक घरामध्ये देवघर किंवा
पूजा घर असणे अतिशय महत्त्वाचे आहे.
देवघरातील दिव्याची किरणे, सुगंधित फुले, धूप, अगरबत्ती याने घरातील वातावरण प्रसन्न होते. घंटानाद
केल्याने मन मस्तिष्कामध्ये चेतना जागरूक होते. त्याचबरोबर मनामध्ये आध्यात्मिक भाव जागरूक होऊन
मनाला शांती प्राप्त होते.
ईशान्य दिशा ही देवघर ठेवण्याची एकमेव दिशा आहे, असा संभ्रम आपल्याला दिसून येतो.
ईशान्य हे पूजा करण्याचे स्थान नसून पूजनीय आहे. 'ईशान' ईश्वर किंवा देव आहे. ही दिशा देव गुरु
बृहस्पतीची आहे, म्हणून इथे मंदिर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पृथ्वी उत्तर-पूर्व दिशेने झुकलेली आहे आणि
ती उत्तर-पूर्वेच्या बिंदूपासून सरकते. जसे रेल्वेचे इंजीन संपूर्ण रेल्वेला खेचून नेते तसे घरातील ईशान्य भागात
देवघर किंवा मंदिर बनवल्यास तेथील ऊर्जा संपूर्ण घराची ऊर्जा त्यादिशेने खेचते किंवा पुढे घेऊन जाते.
तसे पाहयला गेले तर जेथून आपल्याला ऊर्जा (एनर्जी) मिळते ती प्रत्येक गोष्ट देव आहे. जल, अग्नी, वायू,
पृथ्वी, आकाश या सर्वामध्ये आपआपली एक विशिष्ट ऊर्जा आहे. म्हणूनच ही पाच तत्त्वे देवाचेच स्वरूप
आहे. त्यामुळेच वैदिक परंपरेत झाडे, नद्या, दगडगोटे यांची पूजा करण्याची प्रथा आहे. कोणतीही पूजा
करण्यामागे एक उद्देश असतो तो म्हणजे इच्छा पूर्ण व्हावी व मनाला शांती लाभावी. पूजा म्हणजे केवळ
धूप, दिप, आरती हेच नव्हे तर आपले चित्त एकाग्र करून ध्यानस्थ बसणे, ईश्वरीय शक्तीला समर्पित करणे व
जपाच्या माध्यमातून किंवा नामस्मरणातून त्या शक्तीचे आभार व्यक्त करणे हीच खरी पूजा.
देश काल आणि परिस्थितीनुसार प्रत्येकाचा कुलाचार, रूढी, परंपरा यानुसार पूजापाठ करण्याची प्रथा आहे.
वास्तुमध्ये वेगवेगळ्या दिशेच्या झोनच्या वेगवेगळ्या देवी देवता आहेत व त्यानुसार त्यांची पूजा केल्यास
आपल्याला चांगले परिणाम प्राप्त होतात.
ब्रम्हस्थान:
- उत्तर (N): उत्तर हे क्षेत्र कुबेराचे असल्यामुळे या क्षेत्रात कुबेरपूजन, लक्ष्मीपूजन आणि गणेशपूजन
करणे आदर्श मानले गेले आहे.
- उत्तर-उत्तर-पूर्व (NNE): उत्तर-उत्तर-पूर्व या क्षेत्रात शिव परिवार, धन्वन्तरी, अश्विनकुमार यांची
पूजा केल्यास प्रतिकारकशक्ती वाढून चांगले आरोग्य प्राप्त होते.
- ईशान्य (NE): ईशान्य या क्षेत्रात पूजा केल्याने मानसिक स्पष्टता प्राप्त होते व परमेश्वराचे
मार्गदर्शन व आशीर्वाद प्राप्त होतो.
- पूर्व-उत्तर-पूर्व (ENE): पूर्व-उत्तर-पूर्व हे क्षेत्र उत्साहाचे व मनोरंजनाचे असल्याने येथे
राधाकृष्णाची पूजा योग्य मानली गेली आहे.
- पूर्व (E): पूर्व हे क्षेत्र सूर्याचे असल्याने येथे सूर्यवंशी रामाची पूजा योग्य मानली आहे.
- पूर्व-दक्षिण-पूर्व (ESE): पूर्व-दक्षिण-पूर्व हे क्षेत्र चारवाक दर्शन साठी आदर्श मानले आहे. तर्क,
अनुभव आणि आयुर्वेद हे प्रत्यक्षात आहे व तेच सत्य आहे असे त्यांचे मत आहे.
- दक्षिण-पूर्व म्हणजेच आग्नेय (SE): या क्षेत्रात मा दुर्गाची पूजा करणे आदर्श मानले आहे.
- दक्षिण-दक्षिण-पूर्व (SSE): हे क्षेत्र आत्मविश्वास, शक्ती व मजबुतीचे क्षेत्र असल्याने येथे
हनुमानाची पूजा करणे श्रेष्ठ मानले आहे.
- दक्षिण (S): या क्षेत्रात मा कालीची पूजा योग्य मानली आहे.
- दक्षिण-दक्षिण-पश्चिम (SSW): या क्षेत्रात फक्त अघोरीची पूजा योग्य मानली आहे.
- दक्षिण-पश्चिम म्हणजेच नैऋत्य (SW): हे क्षेत्र संबंध म्हणजेच संबंधांचे क्षेत्र असल्याने या भागात
पितरांची पूजा करणे चांगले मानले गेले आहे.
- पश्चिम-दक्षिण-पश्चिम (WSW): हे अभ्यासाचे क्षेत्र असल्याने इथे देवी सरस्वतीची पूजा केली जाऊ शकते.
- पश्चिम (W): पश्चिम या क्षेत्रात गुरू जसे सिख गुरु, जैन गुरु, साईबाबा, भगवान महावीर, भगवान बुद्ध
यांची पूजा योग्य मानली आहे.
- पश्चिम-उत्तर-पश्चिम (WNW): पश्चिम-उत्तर-पश्चिम हे क्षेत्र डिप्रेशनचे (नैराश्याचा) क्षेत्र मानले
गेले आहे. इथे यक्षिणीची पूजा करणे योग्य मानले आहे.
- उत्तर-पश्चिम म्हणजेच वायव्य (NW): वायव्य हे क्षेत्र सपोर्टचे असल्याने येथे पितरांची पूजा करणे
योग्य मानले आहे.
- उत्तर-उत्तर-पश्चिम (NNW): उत्तर-उत्तर-पश्चिम हे आकर्षणाचे क्षेत्र असल्याने या क्षेत्रात पंचमकार
पूजा करावी किंवा तांत्रिक पूजा देखील या क्षेत्रात करणे योग्य मानले आहे.
वरील दिलेल्या सर्व पूजा त्या त्या झोनमध्ये कराव्या व इतर कोणतीही अन्य पूजा करू नये.
या पूजा करताना गुरु किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. पूजा करताना आपले मन अंतकरण शुध्द ठेवावे.
कोणतेही अहित होईल असे भाव मनात आणू नये. पुर्ण श्रध्देने, विश्वासाने केलेली पूजा, नामस्मरण आपल्या
अंतःकरणाला समाधान देते व मन:शांती लाभते.